Monday 12 January 2015

स्वयंपाकघरातील दवाखाना (तीळ व केशर)

फुलाच्या आतले केशरी-लाल रंगाचे तंतू म्हणजे केशर. केशराचे फूल दिसायला फारच मनमोहक असते. तसेच केशराचा सुगंधही अप्रतिम असतो. खाद्यपदार्थांना रंग व सुगंध यावा यासाठी केशर उत्तम असतेच, पण ते औषधी गुणांनीही परिपूर्ण असते. तीळ बुद्धी वाढवितात, दातासाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात.

तीळ म्हटले की तिळगूळ, तिळाच्या वड्या व संक्रांतीचा सण डोळ्यांसमोर येतो. स्वयंपाकात तसेच औषधातही तीळ नित्य वापरले जातात. पांढरे तीळ आणि काळे तीळ असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ गुणाने श्रेष्ठ समजले जातात. तिळाचे औषधी गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत, 

तिक्‍तः पाके कटुः प्रोक्‍तः स्पर्शे शीतो मतिप्रदः ।
दन्त्यो वर्णः कफकरो व्रणं वातं च नाशयेत्‌ ।। ..निघण्टु रत्नाकर
तीळ चवीला कडवट, स्पर्शाने थंड असले तरी विपाकाने तिखट असतात, बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात.

तिळाचा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापर करता येतो. दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्‍त वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. मुका मार लागला, एखादा शरीर भाग मुरगळला तर तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने दुखावलेला शरीरभाग शेकण्याचा उपयोग होताना दिसतो. 

तीळ खाण्याने शौचाला साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्या मूळव्याधीमध्ये रक्‍त पडते, त्यावर अर्धा चमचा तीळ बारीक वाटून चमचाभर घरच्या लोण्याबरोबर घेण्याचा उपयोग होतो. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो. 
- वारंवार लघवी होण्याचा त्रास असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घेण्याचा उपयोग होतो. 
- शरीरामध्ये कुठेही वायूमुळे चमक उठत असेल किंवा एखादा शरीरभाग उडत असेल तर त्यावर तीळ बारीक करून गरम करून शेकण्याचा उपयोग होतो. 
लघवी साफ होत नसेल, अडून राहिल्यामुळे ओटीपोट फुगल्यासारखे झाले असेल अशा वेळी तीळ वाटून, गरम करून ओटीपोटावर लेपाप्रमाणे लावण्याने लघवीला साफ होण्यास मदत मिळते.
- शरीर पोषणासाठीसुद्धा तीळ उत्तम असतात. चमचाभर तीळ पाण्यात भिजवून वाटले व कपभर दुधात कोळून घेऊन त्यात चवीप्रमाणे अर्धा ते एक चमचा गूळ मिसळून घेतले तर शरीर पोषणास मदत मिळते. 
- डोक्‍यामध्ये खवडे होतात, त्यावर तीळ कढईमध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.
- शौचाला खडा होणे, त्यामुळे गुदमार्गात वेदना होणे, क्वचित त्या ठिकाणी चिरा पडल्यामुळे रक्‍तस्राव होणे अशा त्रासांवर काही दिवस रात्रीच्या जेवणात तीळ टाकून तयार केलेली मुगाची पातळ खिचडी व तूप असे खाणे पथ्यकर असते. यामुळे आतड्यांना आवश्‍यक ते वंगण मिळाले की वरील सर्व त्रास कमी होतात. 
- पाळीच्या वेळी अंगावरून कमी जात असल्यास पाळीच्या तारखेच्या आठवडाभर आधीपासून एक चमचा तीळ व एक चमचा जिरे यांचा चार कप पाण्यात एक कप शिल्लक राहीपर्यंत काढा करून, त्यात चवीनुसार गूळ  मिसळून घेण्याचा उपयोग होतो. बरोबरीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने इतर आवश्‍यक उपचार करणेही चांगले. 
- अशाप्रकारे तिळाचा औषध म्हणून वापर करता येतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी तीळ जरा जपून खाणे श्रेयस्कर होय.

केशर
फुलाच्या आतले केशरी-लाल रंगाचे तंतू म्हणजे केशर. केशराचे फूल दिसायला फारच मनमोहक असते. तसेच  केशराचा सुगंधही अप्रतिम असतो. खाद्यपदार्थांना रंग व सुगंध यावा यासाठी केशर उत्तम असतेच, पण ते औषधी गुणांनीही परिपूर्ण असते. 

कुंकुमं कटुकं स्निग्धं शिरोरुक्‌ व्रणजन्तुजित्‌ ।
तिक्‍तं वमिहरं वर्ण्यं व्यदोषत्रयापहम्‌ ।। ...भावप्रकाश
केशर चवीला कडू व तिखट असते, गुणाने स्निग्ध असते, डोकेदुखीसाठी उपयुक्‍त असते, उलटी थांबवते, वर्ण उजळवते व तिन्ही दोषांना संतुलित करते. 

केशराचा औषध म्हणून पुढीलप्रमाणे उपयोग करून घेता येतो.
- लहान मुलांसाठी केशर उत्तम असते. कारण त्यामुळे वारंवार सर्दी, ताप, खोकला होणे टळते तसेच जंतांची प्रवृत्तीही कमी होते. यासाठी दोन चमचे दुधामध्ये केशराच्या दोन काड्या बारीक करून देता येतात.
- पित्त वाढल्यामुळे डोके दुखत असल्यास चंदन उगाळून त्यात चिमूटभर केशर मिसळून तयार केलेला लेप लावण्याचा उपयोग होतो. 
- हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर रोज चिमूटभर केशर मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र, बरोबरीने मूळ कारणावर उपचार होणे आवश्‍यक होय. 
- अर्धशिशीचा वारंवार त्रास होत असेल, तर चमचाभर तुपात छोटी चिमूट केशरपूड नीट खलून त्याचे डाव्या व उजव्या नाकपुडीत दोन-तीन थेंब नस्य टाकण्याचा उपयोग होताना दिसतो. जुनाट सर्दी असेल, तर त्यावरही वरील प्रकारे केशरयुक्‍त तुपाचे नस्य करण्याचा उपयोग होतो. 
- संपूर्ण गर्भारपणात नियमितपणे केशर घेतले तर बाळाची त्वचा सतेज व निरोगी होण्यास मदत मिळते, तसेच योग्य वेळेला कळा सुरू होऊन प्रसूती होण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. 
- दहा वर्षांपेक्षा छोट्या बालकाला जंत होण्याची प्रवृत्ती असेल, तर छोटी चिमूटभर केशराची पूड व तेवढाच कापूर एकत्र करून पाव चमचा मधाबरोबर देण्याचा उपयोग होतो.
- अशाप्रकारे खाद्यपदार्थांना केवळ रंग येण्यासाठीच केशर वापरले जात नसून, त्याच्या अंगी अनेक उत्तम गुणधर्म आहेत. म्हणूनच प्रत्येक स्वयंपाकघरात केशर असणे आणि ते गरजेनुसार योग्य प्रमाणात वापरले जाणे आरोग्यासाठी आवश्‍यक होय.

No comments:

Post a Comment