Monday 12 January 2015

पंचमहाभूते आणि उपचार

पंचमहाभूत सिद्धांताचे आयुर्वेदातील महत्त्व आपण समजून घेतो आहोत. आयुर्वेदाची उपचारपद्धती हीदेखील पंचमहाभूतांवरच आधारलेली आहे. शरीरशुद्धीद्वारा दोष शरीराबाहेर काढून टाकणे आणि प्रकुपित झालेल्या दोषांचे शमन करणे असे उपचाराचे दोन मुख्य प्रकार असतात. या दोन्ही उपचारपद्धती पांचभौतिक सिद्धांतावरच विकसित झालेल्या आहेत. पुढील सूत्रांवरून हे स्पष्ट होऊ शकते,
विरेचनद्रव्याणि पृथिव्यम्बुगुणभूयिष्ठानि । ...सुश्रुत सूत्रस्थान

विरेचन द्रव्ये पृथ्वी आणि जलतत्त्वाचे आधिक्‍य असणारी असतात. ही दोन्ही तत्त्वे जड असल्यामुळे त्यांची वरून खाली जाण्याची प्रवृत्ती असते. यामुळेच विरेचन द्रव्ये शरीरातील दोष, विषद्रव्ये गुदावाटे बाहेर काढून टाकण्यास समर्थ असतात. उदा., काळ्या मनुका, सोनामुखी, बहावा, निशोत्तर वगैरे.
वमनद्रव्याणि अग्निवायुगुणभूयिष्ठानि । ...सुश्रुत सूत्रस्थान

वमन द्रव्यांमध्ये अग्नी आणि वायू तत्त्वाचे आधिक्‍य असते. ही दोन्ही तत्त्वे हलकी असल्याने त्यांच्यात वर जाण्याची प्रवृत्ती असते. यामुळेच वमनातून दोष किंवा विषद्रव्ये मुखावाटे बाहेर काढून टाकता येतात. उदा.,
मदनफळ, वेखंड, निम्ब, पिंपळी वगैरे.
आकाशगुणभूयिष्ठं संशमनम्‌ । ...सुश्रुत सूत्रस्थान

शमन करणारी द्रव्ये म्हणजे वाढलेला, प्रकुपित झालेला दोष शांत करण्याचे सामर्थ्य असणारी द्रव्ये ही सहसा आकाश तत्त्वाचे प्राधान्य असणारी असतात. उदा., गुडूची, अनंतमूळ, चंदन, तूप वगैरे.
संग्राहिकम्‌ अनिलगुणभूयिष्ठम्‌ । ...सुश्रुत सूत्रस्थान

मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारी द्रव्ये वायू तत्त्वाचे आधिक्‍य असणारी असतात, कारण वायुतत्त्वामुळे आतड्यातील अतिरिक्‍त जलांश शोषून घेतला जातो. उदा., कुडा, बेल, कॉफी वगैरे.
दीपनम्‌ अग्निगुणभूयिष्ठम्‌ । ...सुश्रुत सूत्रस्थान

अग्नीला प्रदीप्त करणारी द्रव्ये म्हणजेच भूक नीट लागण्यास मदत करणारी असतात. उदा., चित्रक, मिरी, ओवा, हिंग, बिब्बा, सुंठ वगैरे.
लेखनम्‌ अनिलानलगुणभूयिष्ठम्‌ । ...सुश्रुत सूत्रस्थान

लेखन म्हणजे अनावश्‍यक शरीरधातू खरवडून काढून टाकणे. या द्रव्यांमध्ये वायू व अग्नी अशा दोन्ही महाभूतांचे आधिक्‍य असते. उदा., जव, मध, नागरमोथा, हळद, कुटकी वगैरे.
बृंहणं पृथिव्यम्बुगुणभूयिष्ठम्‌ । ...सुश्रुत सूत्रस्थान

या उलट बृंहण द्रव्ये म्हणजे शरीरधातुपोषक द्रव्ये मुख्यत्वे पृथ्वी व जल यांच्यापासून तयार झालेली असतात. उदा. अश्‍वगंधा, शतावरी, काकोली, विदारीकंद, भुईकोहळा वगैरे.अशा प्रकारे पंचमहाभूते ही आयुर्वेदातील एक मूलभूत संकल्पना होय.

पंचभौतिक प्रकृतीपाचही महाभूते एकमेकांपेक्षा वेगळी, स्वतःची विशिष्ट ओळख असणारी अशी आहेत, पण तरीही त्यांच्यात सुसूत्रता असणे आवश्‍यक असते. त्यातल्या त्यात पृथ्वी व जल ही दोन महाभूते जोडीने राहतात, तसेच आकाश व वायू यांचीही जोडी असते. अग्नी यांच्यामध्ये सुवर्णमध्य सांधणारे तत्त्व असते. आयुर्वेदातील प्रकृती संकल्पना हीसुद्धा पंचमहाभूतांवर आधारलेली आहे. स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग होत असताना वातावरण, मानसिकता, स्त्री-पुरुषांचा आहार, ऋतुमान वगैरे सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन पाच महाभूतांची जी जडणघडण होईल त्यालाच ‘प्रकृती’ म्हणतात. ही प्रकृती प्रत्येकाची विशिष्ट असते.
आपापल्या प्रकृतीनुसार अनुकूल आहार-आचरणाची योजना केली की पाच महाभूते संतुलित राहतात, पर्यायाने आरोग्य टिकून राहते. या उलट कोणत्याही कारणास्तव महाभूतांमधला समन्वय बिघडला, सुसूत्रता खंडित झाली, तर त्यातून अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण मिळू शकते.

No comments:

Post a Comment