Monday 12 January 2015

पुदिना

पुदिनापुदिन्याची छोटी छोटी झाडे असतात. हा एक तुळशीचाच प्रकार असतो. पुदिन्याचे औषधी गुणधर्म पुढीलप्रमाणे होत,
पुदिनस्तु गुरुः स्वादु रुच्यो सुखावहाः ।
मलमूत्रस्तम्भकरः कफकासमदापहा ।।
अग्निमांद्य विषूचीघ्नः संग्रहण्यतिसारहा ।
जीर्णज्वरं कृमींश्‍चैव नाशयेदिति कीर्तितम्‌ ।। ...निघण्टु रत्नाकर

पुदिना रुची वाढवतो, मनाला सुखकर व स्वादिष्ट असतो, कफदोष कमी करतो, कृमींचा नाश करतो, अग्नी मंद झाला असता, तसेच ग्रहणी, अतिसार, जीर्णज्वर, विषूचिका वगैरे रोगात हितकर असतो.

पुदिना औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरता येतो, थंडी वाजून ताप आला असेल, तर आले व पुदिना यांचा काढा करून गरमगरम पिण्याचा उपयोग होतो. दीड कप पाण्यात अर्धा चमचा किसलेले आले, पुदिन्याची सात-आठ पाने व चवीपुरती साखर मिसळून एक कप होईपर्यंत काढा करता येतो. अपचनामुळे पोट दुखत असेल तर पुदिन्याचा अर्धा चमचा रस, लिंबाचा अर्धा चमचा रस आणि चवीनुसार जिरे व काळे मीठ असे मिश्रण घेण्याचा फायदा होतो.

 जंतांची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पुदिना रोजच्या आहारात समाविष्ट करणे चांगले असते. यासाठी रोज दुपारी जेवणानंतर ताकामध्ये चिमूटभर तुपावर भाजलेला हिंग, पाव चमचा पुदिन्याचा रस किंवा वाळवलेल्या पुदिन्याचे चूर्ण टाकून घेता येतो.तोंडाला चव नसल्यास पुदिन्याची पाने कापून त्यावर लिंबाचा रस व सैंधव मीठ टाकून जेवताना मधून मधून खाण्याचा उपयोग होतो.फार दिवस सर्दी-खोकला राहिल्यानंतर मुखाला, श्‍वासाला दुर्गंधी येऊ लागते अशा वेळी पुदिन्याच्या काढ्याच्या गुळण्या करण्याचा उपयोग होतो. यामुळे मुखामधला कफाचा चिकटा दूर व्हायलासुद्धा मदत होते.

पुदिन्याची पथ्यकारक चटणी पुदिन्याची पाने, खारकेची पूड, काळ्या मनुका, जिरे, मिरी, हिंग, सैंधव आणि लिंबाचा रस या सर्व गोष्टी वाटून चटणी तयार करता येते. ताप येऊन गेल्यावर किंवा कोणत्याही मोठ्या आजारातून उठल्यानंतर तोंडाला चव नसते. अशा वेळी ही पथ्यकर चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम असते.

कढीलिंबकढीलिंब किंवा कढीपत्ता हा नावाप्रमाणेच कढीत टाकण्याचा मसाल्याचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीनुसार कढीलिंबाचा पाला तूप लावून विस्तवावर किंचित होरपळून कढीत घातला जातो. यामुळे कढीला उत्तम रुची व सुगंध मिळतो. कढीशिवाय इतरही अनेक खाद्यपदार्थात कढीपत्ता वापरला जातो.
कढीपत्त्याची पाने दिसायला कडुलिंबाच्या पानांसारखीच दिसतात. मात्र ती चवीला अजिबात कडू नसतात, उलट उत्तम सुगंधी असतात. कढीपत्त्याचे झाड परसबागेत किंवा कुंडीमध्ये लावून बाल्कनीमध्ये ठेवल्यास घराची हवा शुद्ध राहण्यास मदत मिळते, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो.

कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत,
कैडर्यः शीतलस्तिक्‍तः कटुश्‍च तुवरो लघुः ।
दाहार्शः कृमिशूलघ्नः संतापविषनाशनः ।।
शोफं कुष्ठं भूतबाधां नाशयेत्‌ इति कीर्तितः ।। ...निघण्टु रत्नाकर

कढीलिंब वीर्याने शीत, चवीला तिखट, कडवट व तुरट असतो, पचण्यासाठी हलका असतो, दाह, अर्श, जंत, वेदना, विष, सूज, त्वचारोग, भूतबाधा, जंतुसंसर्ग वगैरेंमध्ये हितकर असतो.

कढीपत्ता औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरता येतो, त्वचाविकारांमध्ये जेव्हा खाज येते, कितीही खाजवले तरी बरे वाटत नाही, अशा वेळी कढीपत्ता बारीक वाटून तयार केलेली चटणी लावण्याचा उपयोग होतो. कढीपत्ता हा उत्तम जंतनाशक असतो. लहान मुलांना जंतांमुळे गुदभागी खाज येते, त्या वेळी कढीपत्त्याच्या काढ्याने गुदमार्ग धुण्याचा उपयोग होतो. ज्यांना मलप्रवृत्तीसह जंत पडण्याची सवय असते, त्यांनी रोज जेवणापूर्वी मोठ्या वाटाण्याच्या आकाराइतकी कढीपत्त्याची चटणी खाण्याचा उपयोग होतो. यात चवीपुरता ओवा, हिंग व काळे मीठसुद्धा टाकता येते.  तोंडात कफाचा चिकटपणा जाणवणे, गोड खाल्लेले नसतानाही गोडसर चव जाणवत राहणे, अन्न बेचव लागणे अशा तक्रारींवर कढीपत्त्याची तीन-चार पाने चावून खाण्याने व सुटणारी लाळ थुंकून टाकण्याने तोंड स्वच्छ होण्यास मदत मिळते. हिरड्यांतून रक्‍त किंवा पू येणे, मुखाला दुर्गंधी येणे अशा तक्रारींवर कढीपत्त्याच्या पानांचा काढा करून तो चूळ धरल्याप्रमाणे दहा मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याचा उपयोग होतो. खाल्लेले अन्न पचून अंगी लागावे यासाठी आहारात, विशेषतः आमटी किंवा कढी करताना कढीपत्ता वापरणे उत्तम असते.
गवती चहारोजच्या चहामध्ये रुचीसाठी, तसेच चहाची तीक्ष्णता कमी करण्यासाठी गवती चहा टाकण्याची पद्धत असते. यालाच पातीचा चहा असेही म्हणतात. याच्या लांब लांब पाती असतात व त्या अतिशय सुगंधी असतात. गवती चहा औषध म्हणून पुढीलप्रकारे वापरता येतो, ताप आला असता घाम येण्यासाठी गवती चहा उत्तम असतो. गवती चहाच्या दोन पाती दोन कप पाण्यात उकळून एक कप काढा तयार करता येतो. तयार काढ्यात चवीनुसार थोडी साखर घालून तो गरम गरम पिऊन जाड व ऊबदार पांघरूण घेऊन झोपण्याने घाम सुटून ताप कमी होतो. थंडी वाजून सर्दी, खोकला, कसकस वाटत असेल, घसाही दुखत असेल तर गवती चहा, सुंठ व खडीसाखर यांचा काढा करून घेण्याने लगेच बरे वाटू लागते. वाफारा घेताना कुठलेतरी रासायनिक थेंब टाकण्याऐवजी गवती चहाची पात बारीक करून टाकली तर उत्तम उपयोग होताना दिसतो. तापामुळे अंग फार दुखत असेल, तर गवती चहाचा वाफारा संपूर्ण अंगाला घेण्याचाही उत्तम उपयोग होताना दिसतो. वारंवार सर्दीचा त्रास होणाऱ्यांनी काही दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी गवती चहा, आले व दालचिनी यांचा चवीनुसार साखर टाकून केलेला चहा (नेहमीच्या चहापत्तीशिवाय) घेणे चांगले असते. गवती चहाचे तेलही काढले जाते. ते संधिवातावर उपयोगी असते. अशा प्रकारे या तिन्ही वनस्पती आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्‍त असतात.

No comments:

Post a Comment