Thursday, 5 February 2015

स्वयंपाकघरातील दवाखाना - दूध, दही, ताक, लोणी, तूप

घराला घरपण देणाऱ्या गोष्टी म्हणजे दूध, दही, ताक, लोणी व तूप. जगभरात ज्या ज्या देशाला परंपरेचा, संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी दूध, दही, लोणी वगैरे गोष्टींची माहिती असलेली दिसते. नित्य परिचयाच्या असलेल्या या सर्व गोष्टी वेळप्रसंगी औषध म्हणून वापरता येतात.

दूध
दुधाचे गुणधर्म याप्रमाणे होत,
दुग्धं समधुरं स्निग्धं वातपित्तहरं सरम्‌ ।
सद्यः शुक्रकरं शीतं सात्म्यं सर्वशरीरिणाम्‌ ।। ...भावप्रकाश

दूध चवीला मधुर, गुणाने स्निग्ध व वातदोष-पित्तदोष कमी करणारे असते, सारक असते, शीत वीर्याचे असते, तत्काळ शुक्रधातूचे पोषण करते व शरीरासाठी अनुकूल असते.

 दुधामुळे जीवनशक्‍ती वाढते, आकलनशक्‍ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो, तुटलेले हाड सांधते, हाडे बळकट राहतात, ओज वाढते. अनेक मनोरोगात, हृदयरोगात, गर्भाशयाच्या रोगात दूध उत्तम असते.

 दूध सर्वांसाठी आवश्‍यक असतेच, आरोग्य टिकावे, जीवनशक्‍ती उत्तम राहावी आणि हाडांचा-सांध्यांचा बळकटपणा कायम राहावा यासाठी दूध नियमित सेवन करणे उत्तम असते. विशेषतः चमचाभर खारकेची पूड टाकून उकळलेले कपभर दूध पिणे हाडांसाठी विशेष उपयुक्‍त असते.

 लहान मुलांनी नियमित दूध घेतल्याने त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला हातभार लागतो. गर्भारपण व बाळंतपणातही शतावरी कल्प टाकून दूध घेणे उत्तम असते. याने स्त्रीची ताकद चांगली राहतेच, पण बाळालाही पोषण मिळू शकते.

शारीरिक श्रम करावे लागत असल्यास, रोजच्या दिनक्रमामुळे थकवा जाणवत असल्यास, जास्ती बोलण्याचे काम करावे लागत असल्यास, तसेच बौद्धिक काम करावे लागत असल्यास दुधाचे नियमित सेवन करणे श्रेयस्कर होय.

ताक दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते.

हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम्‌ ।
भवेत्‌ अतीव वातघ्नं अर्शोऽतिसार हृत्परम्‌ ।
रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम्‌ ।। ...भावप्रकाश

- भाजलेले जिरे, सैंधव मीठ व हिंग मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मूळव्याध, अतिसारसारख्या रोगातउत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते.
- अपचन म्हणजे जेवणाची वेळ होऊनही भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे यांसारखी लक्षणे असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, पाव चमचा पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ लोणी काढून घेतलेल्या वाटीभर ताकात टाकून घोट घोट घेण्याने बरे वाटते.
- शौचाला बांधून होण्यासाठी ताक उत्तम असते. म्हणून जुलाब होत असल्यास किंवा फार वेळा शौचाला जावे लागत असल्यास तुपाची फोडणी दिलेले ताक पिण्याचा उपयोग होतो. तुपात जिरे, कढीपत्ता, किसलेले आले यांची फोडणी करून, चवीप्रमाणे मीठ मिसळून चविष्ट ताक बनवता येते.
- लघवी साफ होत नसल्यास पातळ ताक पिण्याने लगेच बरे वाटते.
- मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्‍तींनी नेमाने वाटीभर ताक पिणे उत्तम होय. दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.

लोणीदही घुसळले की त्यातून लोणी निघते. ताजे लोणी अतिशय रुचकर असते, मात्र शिळे लोणी किंवा दीर्घकाळ टिकू शकणारे लोणी आरोग्याच्या दृष्टीने हितकर नसते.

नवनीतं तु सद्यस्कं स्वादु ग्राहि हिमं लघु ।
मेध्यं किंचित्‌ कषायाम्लमीषत्‌ तक्रांशसंक्रमात्‌ ।। ...भावप्रकाश

- ताजे लोणी चवीला गोड व ताकाचा अंश असल्याने किंचित तुरट व आंबट असते, पचायला हलके, वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, मेधावर्धक म्हणजे आकलनशक्‍ती सुधारणारे असते.
- लहान मुलांसाठी घरचे ताजे लोणी उत्कृष्ट असते. रोज एक-दोन चमचे लोणी खाण्याने ताकद वाढते, शारीरिक विकास व्यवस्थित होतो आणि आकलनशक्‍ती वाढते.
- गर्भवती स्त्रीने गर्भारपणात घरचे ताजे लोणी चिमूटभर साखर मिसळून खाणे गर्भाच्या एकंदर विकासासाठी उत्तम असते.
- मूळव्याधीमध्ये, विशेषतः मळाचा खडा होण्याची, रक्‍त पडण्याची, आग होण्याची प्रवृत्ती असता लोणी नियमित खाणे उत्तम असते.
- त्वचेचा वर्ण उजळण्याच्या दृष्टीने लोणी खाणे उत्तम असतेच, पण बाहेरून लावणेही उपयुक्‍त असते. विशेषतः उन्हाच्या संपर्कात येणाऱ्या त्वचेवर, मेक-अप काढल्यानंतर त्या ठिकाणी थोडेसे लोणी जिरवले तर त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.
- हातापायांची आग, अशक्‍तपणा, पायाला भेगा, त्वचा कोरडी होणे वगैरे त्रास होत असणाऱ्यांनी रोजच्या आहारात लोणी-साखरेचा समावेश करणे उत्तम असते.

तूप
वरील पद्धतीने बनविलेले लोणी मंद आचेवर कढवले की त्यापासून तूप तयार होते. साजूक तूप हे आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ औषध आहे.
घृतं रसायनं स्वादु चक्षुष्यं वन्हिदीपनम्‌ ।
शीतवीर्यं विष अलक्ष्मीपापपित्तानिलापहम्‌ ।। ...भावप्रकाश

- शास्त्रोक्‍त पद्धतीचे साजूक तूप हे रसायन गुणांनी युक्‍त असते, चवीला गोड असते, डोळ्यांसाठी हितकर असते, तसेच अग्नी प्रदीप्त करते. तूप वीर्याने शीत असते, वात-पित्तदोषांना कमी करतेच, पण विषदोष, अलक्ष्मी, पाप यांचाही नाश करते.
- तूप कांतिवर्धक, सौंदर्यवर्धक असते. तूप सेवन करण्याने त्वचेला उचित स्निग्धता मिळून त्वचा घट्ट, चमकदार राहण्यास मदत मिळतेच पण बाहेरून तूप लावण्यानेही त्वचेवरचा काळपटपणा, खरखरीतपणा नाहीसा होण्यास मदत मिळते.
- बुद्धी, स्मृती, आकलनशक्‍ती या तिन्ही प्रज्ञाभेदांसाठी तूप उत्कृष्ट असते. शिक्षण क्षेत्रातील व्यक्‍तींनी, बौद्धिक काम करावे लागणाऱ्यांनी, तसेच
 कामाचा ताण असणाऱ्यांनी नियमित तूप सेवन करणे उत्तम असते.
- तुपामुळे बुद्धिसंपन्नता मिळतेच पण जीवनशक्‍ती वाढते, प्रतिकारशक्‍ती वाढते. एकंदर तेजस्विता वाढते म्हणूनच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वांसाठी तूप उत्तम असते.
- गर्भारपणात व बाळंतपणात स्त्रीने खाल्लेल्या तुपाचा तिला स्वतःला व बालकालाही फायदा होतो. सहा महिन्यांनंतर बालकाला बाहेरचे अन्न सुरू केले, की त्यालाही घरचे तूप देणे सुरू करता येते.
- मलावरोधाचा त्रास असल्यास गरम पाण्यासह एक-दोन चमचे तूप घेण्याचा उपयोग होतो. याने अग्नीची ताकद वाढतेच, शिवाय पचनसंस्थेतील रुक्षता दूर होऊन पोट साफ व्हायला मदत मिळते.
-  झोप शांत लागत नसणाऱ्यांनी, अतिताणाचे काम असणाऱ्यांनी, वारंवार डोके दुखण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी आहारात तुपाचा पुरेसा समावेश करणे चांगले असतेच; पण रात्री झोपताना नाकात साजूक तुपाचे तीन-चार थेंब टाकणे, टाळूवर तूप जिरवणे उत्तम असते. यासाठी साध्या तुपापेक्षा ‘नस्यसॅन’सारखे औषधी तूप वापरले तर अधिक चांगला गुण येताना दिसतो.
- मानसिक विकारांवर तुपासारखे उत्तम औषध नाही असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये. उन्माद, अपस्मार, नैराश्‍य यांसारख्या विकारात आहारासह तूप खाणे आणि ‘संतुलन ब्रह्मलीन घृता’सारखे औषधांनी सिद्ध तूप खाणे या दोहोंचाही अप्रतिम उपयोग होताना दिसतो.
- जखम भरून येण्यासाठीसुद्धा तुपाचा उपयोग होताना दिसतो. खरचटणे, भाजणे अशा तऱ्हेच्या जखमांवर तूप लावल्यास आग व वेदना कमी होतात व जखम पटकन भरून येते. जुनाट जखमाही तुपाच्या, विशेषतः औषधी तुपाच्या योगे भरून येताना दिसतात.
- तुपाचा विशेष गुण म्हणजे तूप जेवढे जुने तेवढे अधिक गुणकारी होते. विशेषतः मानसिक रोगांवर, नेत्ररोगांवर व विषरोगांवर जुने तूप अधिक प्रभावी असते. जुन्या तुपाने जखमाही अधिक चांगल्या प्रकारे भरून येतात.

No comments:

Post a Comment