Showing posts with label #Pune. Show all posts
Showing posts with label #Pune. Show all posts

Saturday, 29 November 2014

#शिवनेरी किल्ला #पुणे #Shivneri

                           शिवनेरी                               


किल्ल्याची उंची - 3500 फूट 

श्रेणी - मध्यम ,किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग 

डोंगररांग - नाणेघाट ,जिल्हा - पुणे 

 

          शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान.

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात.

साखळीची वाट : या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टॅंड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे.येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिरलागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्यासाखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट : शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

मुंबईहून माळशेज मार्गे: जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर 8 ते9 किलोमीटरवर "शिवनेरी 19 कि.मी.' अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.

इतिहास -
                       'जीर्णनगर', 'जुन्नेर' म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. इ. स 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ. स 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. "शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके 1556 क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार.' इ. स. 1632 मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि 1637 मध्येमोगलांच्या ताब्यात गेला. 1650 मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. 1673 मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे 40 वर्षांनंतर 1716 मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

शिव मंदीर
  • शिवाई देवी मंदिर-
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे.
  • अंबरखाना-
शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.
  • पाण्याची टाकी-
वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.
  • शिवकुंज -
हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याची स्थापना व उद्‌घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.
  • शिवजन्मस्थान इमारत-
शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजीचा जन्म झाला तेथे त्याचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.येथे शिवाजी महाराजांचा पाळणा आहे.
  • कडेलोट कडा-
येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.



















मित्रांनो या ब्लोग वर मी जी माहिती टाकली आहे ती माहीती पुस्तकातून,विविध वेब साईट व माझी स्वतः ची माहिती एकत्र करून सर्व माहिती टाकतो यासाठी सर्व श्रेय फक्त मलाच नाही लेखक जाते.