Monday, 9 February 2015

स्वयंपाकघरातील दवाखाना

घरातील प्रत्येकाला बदाम, पिस्ते, काजू असा सुका मेवा हातावर ठेवणे सगळ्यांना परवडते असे नाही, पण लहान मुलांना अबरचबर देण्याऐवजी त्यांच्या हातावर चार मनुका ठेवल्या जाणे चांगले. बदाम मेंदूला ताकद देण्याचे काम विशेषत्वाने करतात. म्हणून रोजच्या आहारात बदामाचा समावेश करणे श्रेयस्कर ठरते. खारीक, बदाम, काजू, खडीसाखर, मनुका/बेदाणे एकत्र करून केलेले पंचखाद्य प्रसाद म्हणून वापरले, तर स्वयंपाकघरात असलेल्या खारकेचा आरोग्यासाठीही फायदा होऊ शकतो.

साधारणतः खजूर आपल्याकडे फक्‍त उपवासाच्या दिवशी खातात. कारण त्या दिवशी चौरस अन्न खाल्ले जात नाही, अशा वेळी भूक घरून ठेवण्यासाठी, तसेच रक्‍तवाढीसाठी खजुराचा उपयोग होतो. खजूर थोडासा उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे तो तूप घालून खावा. कोणताही खजूर वाळविल्यानंतर खारीक होते, असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण खारीक बनविण्यासाठी विशेष प्रजातीचा खजूर आवश्‍यक असतो. खारकेचेही दोन प्रकार असतात. एक पांढरी छोटी खारीक, जी खुसखुशीत असते; दुसरी गर्द तपकिरी रंगाची खारीक, ज्यात तंतू अधिक प्रमाणात असतात व त्यामुळे ती चिवट असते,  कुटायलाही अवघड असते.

खारीक सर्वांसाठी अत्यंत उपयुक्‍त असते. उत्तर हिंदुस्थानात मीठ, मसाला लावून खारीक खाल्ली जाते. तान्ह्या बाळालाही गुटीबरोबर खारीक उगाळून दिली जाते. इतकेच नव्हे तर हाडे मजबूत होण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, ताकद वाढविण्यासाठी, ऑस्टिओपोरोसिस, सांधेदुखीसारख्या विकारांमध्ये दुधात खारकेची पूड उकळवून त्यात साखर घालून घेणे उपयुक्‍त असते. खारीक दुधात उकळल्यामुळे पचायला हलकी होते, शिवाय शीतवीर्याची असल्यामुळे वात, पित्त कमी करते व मुख्यतः शुक्रधातूसाठी उपयोगी ठरते. खारीक स्त्रियांनाही खूप उपयोगी असते. खारकेच्या बिया मूळव्याधीच्या इलाजासाठी उपयोगी असतात. डिंकाच्या लाडूत किंवा बाळंतिणीच्या खाण्यातच केवळ खारीक वापरावी असे नव्हे, तर सर्वांसाठीच खारीक अत्यंत उपयोगाची आहे. या दृष्टीने खारीक, बदाम, काजू, खडीसाखर, मनुका/बेदाणे एकत्र करून केलेले पंचखाद्य प्रसाद म्हणून वापरले तर स्वयंपाकघरात असलेल्या खारकेचा आरोग्यासाठीही फायदा होऊ शकतो.

बदाम हा तर सर्व सुक्‍या मेव्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक. बदाम हा श्रीमंतांनी खाण्याचा पदार्थ आहे असे समजले जाते. पण ते तितकेसे खरे नव्हे. कारण एक बदाम जरी उगाळून घेतला तरी त्याचा फायदा होतो. बदाम मधुर रसाचा व स्निग्ध असल्यामुळे वात, पित्ताचे शमन करतो. बदाम, बदामाचा शिरा वगैरे पदार्थ अति प्रमाणात खाल्ले तर थोडासा कफ वाढू शकतो. पण बदाम हा सर्व धातूंचे पोषण करणारा, शुक्रधातू वाढविणारा असल्यामुळे याचा क्रमांक पौष्टिक पदार्थांमध्ये वरचा आहे. अंगावर फोड उठले असल्यास बदाम उगाळून लावण्याचा फायदा होतो. मूठभर बदाम खाल्ले तर ते चावले जात नाहीत, तेव्हा बदाम उगाळून घेण्याचा फायदा अधिक असतो. रात्रभर पाण्यात भिजविलेले पाच बदाम दुसऱ्या दिवशी सोलून नीट चावून चावून मोठ्या माणसांनी खावे. बदाम महाग असल्याने लहान मुलांना किंवा तरुण माणसांना ताकदीसाठी एक-दोन बदाम व चमचाभर हरभऱ्याची डाळ भिजवून देण्याचा फायदा होतो. उगाळून खाल्लेला एक बदाम तीन बदामांचे काम करतो. वाटलेले बदाम, खसखस लावून केलेले दूध घेतल्याने शरीरासाठी उत्तम असते. यातच चिमूटभर केशर टाकले तर आणखीनच लाभ होतो. बदामाचे तेल त्वचेसाठी, मस्तकासाठी चांगले असते. बदाम मेंदूला ताकद देण्याचे काम विशेषत्वाने करतात. म्हणून रोजच्या आहारात बदामाचा समावेश करणे श्रेयस्कर ठरते.

सुक्‍या मेव्यातील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे मनुका. मुळात द्राक्षे ताकदीसाठी उत्तम असतातच. म्हणून द्राक्षे वाळवून तयार केलेले बेदाणे व मनुका ताकदीसाठी अत्यंत लाभदायक ठरतात. ज्या द्राक्षांमध्ये बी असते ती बहुधा काळी असतात, त्यांच्यापासून मनुका तयार होतात. बिनबियांच्या हिरव्या द्राक्षांपासून बेदाणे तयार केले जातात. चांगली गोड द्राक्षे पूर्ण तयार झाल्यानंतर त्यांच्यापासून बेदाणे वा मनुका होऊ शकतात. थोडासा उपचार करून साध्या द्राक्षांपासून बनविलेले बेदाणे-मनुका थोड्या आंबट असू शकतात.

मनुका मधुर रसाच्या असल्याने उत्तम असतातच. त्या पचायला सोप्या असतात. मनुका शीतवीर्य व त्रिदोषशामक असतात. लहानपणी पोट खराब झाले असता पाण्यात मनुका उकळवून ते पाणी प्यायल्याचे व उरलेल्या मनुका चावून चावून खाल्ल्याचे स्मरणात आहे. ताप येणे, हिमोग्लोबिन कमी होणे, ताकद कमी होणे या सर्वांसाठी मनुका उपयोगी असतात. मनुकांमधल्या बिया काढून त्यापासून धात्री रसायनासारखी औषधे आयुर्वेदात बनविली जातात. घरातील प्रत्येकाला बदाम, पिस्ते, काजू असा सुका मेवा हातावर ठेवणे सगळ्यांना परवडते असे नाही, पण लहान मुलांचा अबरचबर देण्याऐवजी त्यांच्या हातावर चार मनुका ठेवल्या जाणे चांगले. 

विरेचनासाठी मनुकांचा उपयोग होऊ शकतो. शौचाला साफ होत नसेल तर मनुका तुपावर भाजून काळे मीठ लावून खाल्ल्या तर इतर कोणताही त्रास न होता शौचाला साफ होण्यास मदत मिळते. पायाची, शरीराची आग होत असेल तर मनुका व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याचा उपयोग होतो. म्हणूनच प्रसादामध्ये मनुका व खडीसाखर यांचा उपयोग केलेला दिसतो. मोठ्या आजारातून उठल्यामुळे अशक्‍तपणा जाणवत असल्यास मनुका अवश्‍य खाव्यात. जागरण करणाऱ्यांनी मनुका अवश्‍य खाव्यात, जेणेकरून डोळ्यांची आग होत नाही. पित्त वाढल्यामुळे उलट्या होत असल्यास मनुका व साळीच्या लाह्या पाण्यात भिजवून कुस्कराव्या व पाणी गाळून घ्यावे. या पाण्यात थोडी खडीसाखर टाकून थोडे थोडे घेतल्यास फायदा होतो. मोठ्या आजारातून उठलेल्याला, वारंवार जागरण होत असणाऱ्यांना, अन्न नीट पचत नसल्यास, अंगात कडकी असल्यास मनुका उत्तम काम करतात. गोवर, कांजिण्या येऊन गेल्यावर अंगात उष्णता राहते, अशा वेळी मनुका-तूप खाण्याने फायदा होतो.

बेदाण्यांचा उपयोग द्राक्षासारखाच होतो. प्रसादाचा शिरा, पुलाव वगैरे पदार्थांमध्ये बेदाणे वापरण्याची पद्धत आहे. कारण ते निर्बीज असल्यामुळे स्वयंपाकात वापरायला बरे पडतात. बेदाण्यांच्या गोडव्यामुळे या पदार्थांची लज्जत आणखीनच वाढते.

अशा प्रकारे स्वयंपाकघरात असलेले हे पदार्थ आयुर्वेदिक दवाखान्यात वापरून आपल्याला आरोग्यासाठी उपयोग करून घेता येतो.

No comments:

Post a Comment