Tuesday, 9 December 2014

पैठणी

                      पैठणी                   
पैठणी ही मराठी स्त्रीची शान समजली जाते. काहीशी महाग असणारी पैठणी पूर्वी हाताने विणली जायची, त्यावर रंगकाम, भरतकाम करणारे कलाकार होते. पैठणी बनवण्याची कला साधारण २००० वर्ष जुनी आहे. पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाडयातले 'प्रतिष्ठान' म्हणजेच आताचे पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. त्यावेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचे सूत व रेशीम धागा निर्यात केला जायचा. १८व्या शतकात पेशव्यांचे राज्य होते. पेशव्यांनी पैठणींच्या उत्पादनाला प्रोत्साहन आणि चालना दिली. माधवराव पेशवे यांनी येवल्यात करागीरांना पैठणी विणायला सुरूवात करुन दिली. म्हणून पेशवे इतिहासात येवला हे पैठण इतकेच प्रसिद्ध झाले. असे मानले जाते की हैदराबादचा निजामही या पैठणीवर फिदा होता व त्या निमित्ताने त्याने पैठणला प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्याची स्नूषा निलोफर हिनेही पैठणीच्या काठ व पदरावरचे नक्षीकाम सुचवले होते. मात्र इंग्रजांच्या राज्यात बाकी स्थानिक कलांसारखीच पैठणी तयार करण्याची कलाही कमी होत गेली.
पैठणी ही साडी जगभरात 'रेशीम आणि जरीत विणलेली कविता' म्हणून प्रसिद्ध आहे. आकर्षक, गडद रंग, नाजूक रेशीम, (मागणीपैठणीनुसार अस्सल सोन्याच्या तारांचा) जरीचा काठ पैठणीला साडयांमध्ये सर्वात वरचे स्थान मिळवून देते. एक साडी पूर्ण करायला एक महिना ते एक वर्ष लागतो. आता जरी आधुनिक यंत्र उपलब्ध असली तरी उत्कृष्ट पैठणी ही फक्त हातानेच विणता येते असे विणकरांचे ठाम मत आहे. आधी पैठणीसाठी लागणारे रेशीम चीनहून आयात केले जायचे. मात्र अलिकडे बंगलोर मधून रेशीम मागवतात.
पैठणीचे रंग आणि नक्षी वैशिष्टपूर्ण असते. पैठणी मुख्यता दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग व दुसरा काठावरचा रंग. काही साडया 'कॅलिडोस्कोपिक' असतात. म्हणजे त्या साडीची वीण दोन रंगातली असते व आपल्याला कधी एक तर कधी दुसरा असे झटकन बदलणारे रंग दिसतात. पैठणी विणण्याकरता काही ठरलेले रंग आहेत. पैठणीत वापरण्यात येणारे रंग असे - पोफळी (ऑकर), लाल (रेड), फिक्कट जांभळा (लॅवेंडर), जांभळा (वायोलेट), निळा (ब्लू), किरमिजी तांबडा (मॅजेंटा), मोतीया (पर्ल पिन्क), वांगी (ब्रिन्जॉल), मोरपंखी (पिकॉक ब्लू). पूर्वी हे सर्व रंग नैसर्गिक असायचे. वेगवेगळ्या भाज्या, फळे, फुले यांच्यापासून ते तयार होत. कॅलिडोस्कोपिक रंग असे वापरले जातात - कुसूंबी (लाल/जांभळा) , लाल/हिरवा, काळा/पांढरा, लाल/काळा, पिवळा/हिरवा.
पैठणी साडीवरची नक्षी देखील वैशिष्टपूर्ण आहे. अजिंठा लेण्यांच्या प्रभावामुळे पैठण कारागीरांवर बौध्द धर्माचा प्रभाव अधिक होता. हा प्रभाव त्यांच्या नक्षीकामातही जाणवतो जसे कमळाचे फूल, हंस, फूलांची वेलबुटटी, नारळी, मोर, राघू-मैना इत्यादीचा वापर अत्यंत आकर्षकपणे केला जातो.
कवयत्री शांता शेळक्यांची 'पैठणीवर' अत्यंत भावस्पर्शी कविता आहे -
फडताळांत एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी,
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.
माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती,
पडली होती सा-याच्या पाया हाच पदर धरून हाती,
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास,
ओळखीची... अनोळखीची... जाणीव गूढ आहे त्यास.
धूप कापूर उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण,
पैठणीने जपले एक तन... एक मन...
माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली,
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.
वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला,
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला,
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले,
सौभाग्य मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.
कधीतरी ही पैठणी मी धरते ऊरी कवळून,
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून,
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळ्तो धागा,
पैठणीच्या चौकडयांनो, आजीला माझे कुशल सांगा.

No comments:

Post a Comment